प्रत्येक प्राण्याचा एक मूळ स्वभाव असतो. याच स्वभावामुळे प्राणी विशिष्ट प्रजातीच्या प्राण्यांपासून आणि विशेषतः मनुष्यांपासून अंतर राखून असतात. परंतु मनुष्याने संपवलेल्या वनांमुळे त्यांच्यावर पोट भरण्यासाठी अन्नाचा प्रश्न निर्माण झाला आहे. एरवी मनुष्याच्या पावलांची चाहूल लागली तरी तुरु-तुरु झाडावर चढणारी खारुताई आता मोठ-मोठ्या सोसायट्यांच्या खिडकीपर्यंत अन्नासाठी पोहचत आहे.
पिंपरी-चिंचवड आणि मावळ परिसर एकेकाळी वृक्ष, वनस्पती आणि वेलींनी बहरलेला असायचा; परंतु जशी-जशी लोकवस्ती वाढू लागली, तस-तशी झाडे कमी होऊ लागली. मावळात अद्यापही वने आहेत; परंतु तिथेही मनुष्याचा प्रचंड हस्तक्षेप वाढला आहे. मानवाचा हा हस्तक्षेप या पक्षी-प्राण्यांसाठी अमानवीय ठरला आहे. मावळ, पवन-मावळ, मुळशी, पिंपरी-चिंचवडमधील दुर्गादेवी टेकडी परिसर, वडगाव, घोरवाडी, कार्ला, भाजे, खोपोली, कामशेत, आंदर-मावळ, लोहगड, विसापूर किल्ल्यांचा परिसर, गडकोट, डोंगर-दर्यात मोठ्या प्रमाणात सन् 1980 ते 1995 पर्यंत वृक्ष संपदा आणि जैव विविधता, दुर्मिळ पक्षी, औषधी वनस्पती उपलब्ध होती. परंतु ह्या वीस वर्षांत शहरीकरण आणि पर्यावरणाबाबत अयोग्य प्रशासकीय अंमलबजावणी, सामाजिक वनीकरणाकडे दुर्लक्ष यामुळे पश्चिम घाट परिसरातील पिंपरी-चिंचवड शहरालगतचा भाग आता उजाड होत आहे.
प्राण्यांचा स्वभाव व आहार बदलला
पशू-पक्ष्यांचे नैसर्गिक खाद्य संपल्यामुळे प्राण्यांना जगण्यासाठी आपल्या मूळ स्वभावात बदल करावे लागल्याचे दिसते. माकडे माणसाळली, खारुताईने मूळ लाजरा स्वभाव सोडला आणि खाण्यासाठी मनुष्य वस्तीत प्रवेश केला. सर्वांचाच नैसर्गीक आहार बदलला आहे. पक्ष्यांसाठी उरलेले चपातीचे तुकडे, भात, भाजी घराच्या खिडकीत नागरीक ठेवतात. चिमण्या, कावळे, खारुताई, कोकिळा आता हेच अन्न खाऊन जगत आहेत.
पर्यावरण अभ्यासकांच्या मते, वन्यजीवांचा मानवी वस्तीकडे वाढता कल हा केवळ त्यांच्या स्वभावातील बदल नसून पर्यावरणीय असमतोलाचा इशारा आहे. जंगलातील अन्नसाखळी आणि अधिवास सुरक्षित राहिल्यास प्राणी त्यांच्या नैसर्गिक परिसरातच राहणे पसंत करतात. मात्र जंगलांचे क्षेत्र कमी होत गेल्यास मानव-वन्यजीव संघर्ष वाढण्याची शक्यता निर्माण होते.
पर्यावरण संवर्धनासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपणाबरोबरच लावलेल्या झाडांचे संगोपन, नैसर्गिक वनक्षेत्रांचे संरक्षण आणि जैवविविधतेचे जतन करणे आवश्यक आहे. अन्यथा भविष्यात अनेक पक्षी आणि प्राणी पूर्णपणे मानवी वस्तींवर अवलंबून राहण्याची वेळ येऊ शकते. खारुताईपासून पक्ष्यांपर्यंत सर्वच जीव अन्नासाठी मनुष्याशी मैत्री करत असल्याचे दिसत असले, तरी त्यामागे निसर्गाच्या बदलत्या वास्तवाची गंभीर कहाणी दडलेली आहे.


